महिन्याच्या शेवटी पैशांची तंगी जाणवते ? मग, ‘या’ खास टिप्स वाचाच…!

दर महिन्याच्या सुरुवातीला बँक खात्यात पगार जमा झाला की होणारा आनंद हल्ली क्षणिक ठरतोय. कारण “रात्र थोडी सोंगे फार” अशी आपली अवस्था होत आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच आर्थिक तंगी जाणवायला लागते. आपला अवास्तव खर्च होतोय हे लक्षात येऊन ही बऱ्याचदा पैसे उडवले जातात. लगेच एक संकल्प ही केला जातो, की पुढच्या महिन्यापासून पैसे वाचवायचे. पण ते एक्झॅक्टली कसे करायचं याच्या काही टिप्स या लेखात जाणून घेऊ.

paise kase vachvayache

1) अत्यावश्यक खर्चाची यादी तयार करा

काही खर्च हे केलेच पाहिजेत असे असतात. जसे घरभाडे, मेंटेनन्स, लाईट बिल, दूध, पेपर बिल, किराणा, भाजीपाला, मुलांच्या फीस वगैरे. या खर्चाची रक्कम बाजूला काढून ठेवा. हा खर्च ढोबळ मानाने दर महिन्याला सारखाच असतो. मग तुम्हाला साधारण किती पैसे उरतात ते समजेल.



अतिआवश्यक खर्चात ही बचत करता येते, कशी ते पहा.

  • बहुतेक वेळा किराणा माल किंवा वाणसामानाची खरेदी सुपर मार्केट मध्ये केली जाते. तीच खरेदी तुम्ही धान्य बाजारात केली तर अतिशय स्वस्तात पडते. धान्य बाजारातील दुकानदारांना आपल्या दुकानाच्या सजावटीसाठी, एअर कंडिशनिंग वगैरे खर्च नसतो. म्हणून सुपर मार्केट सारखे ते या खर्चाचा बोजा अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर लादत नाहीत. पर्यायाने आपल्याला चांगला माल वाजवी दरात मिळतो.
  • मोठ्या सोसायटी, टॉवर्स, कॉम्प्लेक्स जवळ मिळणाऱ्या आणि मंडई जवळ मिळणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात दुपटीचा फरक असतो. शक्य असेल तर प्रत्येक रविवारी सकाळी मंडई मधून आठवडा भराच्या भाज्या आणून ठेवा.

2) कधीतरी करावा लागणारा पण आवश्यक खर्च.

बहुतेकदा एखाद्या महिन्यात अचानक काही खर्च उद्भवतात. जसे आजारपण, नातेवाईक, मित्रमंडळी यांचे काही कार्यक्रम, विम्याचे हप्ते वगैरे. अशा खर्चासाठी एक छोटीशी रक्कम दर महिन्याला बाजूला काढून ठेवा. त्यासाठी एखादे दुसरे सेविंग अकाऊंट उघडा आणि दर महिन्याला पगारातून ती रक्कम परस्पर या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था करा.

या खर्चात ही थोडी बचत करु शकतो. जसे



  • ओळखीच्या मुलांच्या वाढदिवसाला द्याव्या लागणाऱ्या भेटवस्तू जसे टिफीन बॉक्सेस, वॉटर बॉटल्स, क्रेयॉन्स, चित्रांची, गोष्टींची पुस्तके वगैरे वस्तू तुम्ही एकदाच प्रत्येकी तीन चार नग प्रमाणे खरेदी केल्याने दुकानदारांकडून बिलामध्ये सवलत मिळवू शकता.
  • लग्न, मुंज अशा कार्यक्रमात भेटवस्तू देताना यजमानांची गरज विचारून घ्या किंवा सरळ रोख रक्कम द्या. जेणेकरून त्या वस्तूचा उपयोग केला जाईल किंवा पैशाचा योग्य विनियोग होईल. बहुतेकदा न विचारता आपण महागमोलाची वस्तू गिफ्ट करतो आणि तिचा याजमानंकडे फारसा उपयोग न होता पडून राहते.

3) अनावश्यक खर्च

यामध्ये हौस म्हणून शॉपिंग करणे, चित्रपट पाहणे, भरमसाठ पार्ट्या पिकनिक करणे या गोष्टी येतात. आपले बजेट शंभर टक्के याच गोष्टींमुळे कोलमडते. त्यांच्यावर नियंत्रण आणणे गरजेचे असते. कसे ते पहा.

ऑनलाईन शॉपिंग

ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटस् मुळे बाजारात जाऊन खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. अगदी बसल्या बसल्या ही तुम्ही खरेदी करू शकता आणि वस्तू घरपोच मिळतात. पण याच गोष्टींमुळे आपला खर्च वाढतो. कारण प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी केल्याने आपल्याला घासाघीस करता येते. वस्तूची खरी किंमत आणि दर्जा कळतो. लगेच मोजून पैसे द्यायचे असल्याने आपण क्षणभर थांबून त्या वस्तूची गरज आहे का याचा विचार करतो. या गोष्टी ऑनलाईन शॉपिंगमध्ये शक्य होत नाहीत.

जवळजवळ रोजच अशा इ कॉमर्स वेबसाईटवर कसले ना कसले सेल, ऑफर्स चालू असतात. त्यांना बळी पडून गरज नसतानाही भरमसाठ खरेदी केली जाते. कित्येकदा त्याच वस्तू, काही वेळा तर त्याही पेक्षा चांगल्या दर्जाच्या वस्तू बाजारात स्वस्तात मिळतात. पण आळशीपणा करुन आपण बाजारात जात नाही. म्हणून पैसे वाचवायचे तर आधी कपडे, नकली दागिने, सौंदर्यप्रसाधने विकणारे ॲप मोबाइल मधून डिलिट करा. यामुळे तुम्ही फक्त गरज असेल तरच ती वस्तू खरेदी कराल.

हॉटेलिंग आणि पार्टी

हॉटेलिंग मुळे ही बऱ्याचदा आपले बजेट कोलमडते. म्हणून पैसे वाचवायचे असतील तर प्रत्येक वीकेंडला बाहेर जेवायला जाण्यापेक्षा फक्त एखादा पदार्थ जसे भाजी किंवा भाताचा एखादा प्रकार बाहेरून मागवून उरलेला स्वयंपाक जसे चपाती, आमटी वगैरे घरी बनवले तर बराच खर्च वाचतो. अगदी मित्रमंडळींना बोलावून पार्टी करावीशी वाटली तर ‘पॉट लक पार्टी’ ठेऊ शकता ज्यामध्ये प्रत्येक जण एक एक पदार्थ घेऊन येईल.

दोन तीन कुटूंब मिळून हॉटेलमध्ये गेलात तरी बिलाची रक्कम वाटली जाईल आणि प्रत्येकाचा पैसा वाचेल. हाच फॉर्म्युला पिकनिकसाठी पण वापरता येईल. म्हणजे जास्त मित्रमंडळी खर्चाचे विभाजन..

अजून काही उपाय खाली दिले आहेत.

4) मनोरंजनासाठी अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेतले असेल तर जो प्लॅटफॉर्म कमी वापरला जातो त्याचे सबस्क्रिप्शन बंद करून टाका. ऑटो सबस्क्रिप्शन बंद आहे याची खात्री करून घ्या.

5) क्रेडिट कार्डवर व्यवहार करणे टाळा. आज न उद्या तुम्हालाच त्याचे बिल भरायचे आहे त्यामुळे एक तर डेबिट कार्ड वापरा किंवा सरळ रोखीमध्ये व्यवहार करा.

6) मुलांच्या, जोडीदाराच्या नावाने स्वतंत्र बँक खाते किंवा आरडी अकाऊंट उघडा. पगारातून ठराविक रक्कम आपोआप त्या खात्यात वळती होईल अशी व्यवस्था करा.

7) जर शक्य असेल तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करा. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या खर्चात बचत होईल.

8) मोठ्या सणांच्या आधी बरीचशी दुकानं स्टॉक क्लिअरन्स सेल लावतात. त्याचा जरूर लाभ घ्या.

9) मॉल मध्ये खरेदी केल्यावर मिळणारी कूपनस वेळेवर रेडीम करा.

असे अनेक उपाय अमलात आणून तुम्ही सहजपणे भरपूर बचत करू शकता. लक्षात ठेवा money saved is money earned.